“एकनाथजी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…”; मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई | मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या राधिका छोट्या वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत ती अरूंधतीच्या मैत्रिणीचं म्हणजेच देविकाचं पात्र साकारत आहे. तसंच राधिकानं काही दिवसांपूर्वीच शासनाचा हाॅल सवलतीच्या दरात मिळत नसल्यामुळे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे संताप व्यक्त केला होता. तर तिनं याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे जी सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण या पोस्टमध्ये तिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचाही उल्लेख केला आहे.
सध्या राधिका ही ‘सियावर रामचंद्र की जय’ या बाल-महानाट्य प्रयोगात व्यस्त आहे. या नाट्यासाठी राधिका शासनाचा हाॅल सवलतीच्या दरात मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होती. पण बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, आता तिला शासनाचा हाॅल मिळाला आहे. त्याबद्दल तिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. याबाबतची पोस्ट तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.
“चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ.”
“सियावर रामचंद्र की जय”मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध.
मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, “मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.” तसेच घडले.
ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे.
“देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है”, असं मला दिसतं आहे.
पार्श्वभूमी अशी की मी बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत होते. सरकार वर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला. आणि सरकार कडून त्वरित कारवाई सुरू झाली. चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसली ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्या पर्यंत पोहोचली. यंत्रणा हलली. आम्हाला हॉल मिळाला, आम्ही नाटक सादर केलं. एक प्रभु श्रीराम आमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही त्याचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करून दिलात. लहान मुलांसमोर एक उदाहरण ठरलात. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. “एक नाथ कसा असावा तर असा!” धन्यवाद.
अतिथी म्हणून आलेल्यांसाठी आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची आरास आहे आणि आम्ही झालर बनून उभे आहोत आशेने पहात. धन्यवाद.
२ माणसं वाईट भेटली पण ४ चांगली माणसं ही भेटली आम्हाला! विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे मंजुश्री ताई खर्डेकर, संदीप खर्डेकर, सचिन पाषाणकर, किरण साळी, राहुल सर. धन्यवाद.
“चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ची कहाणी “चार हात, दोन फोन, एक नाथ” पर्यंत सुफळ संपन्न.
बोलो “सियावर रामचंद्र की जय”
~ रानी – राधिका देशपांडे
सध्या राधिकाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिन एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत भाजप नेते चंद्रकांत पाटील, इतर नेतेमंडळी आणि बालकलाकार दिसत आहेत.