मुंबई | Aditya Thackeray – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं निर्देश दिले. त्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगानं शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आले होते. त्यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड यांचा समावेश होता. यामध्ये आता निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल-तलवार हे पक्षचिन्ह देण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आमच्याकडे बहुमत असून ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला मिळायला हवं होतं असं विधान केलं आहे. यासंदर्भात शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे.
निवडणूक आयोगानं दोन्ही गटांची नावं निश्चित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी, “हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक आहे. धनुष्यबाण चिन्ह बहुमताच्या आधारे आम्हाला मिळायला हवं होतं. आमच्याकडे 70 टक्के बहुमत आहे. आमचं चिन्ह आणि पक्षासंदर्भातील दावा कायम आहे”, अशी प्रतिक्रिया दिली होती.
यासंदर्भात आदित्य ठाकरे यांना ‘मुंबई तक’वरील मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेलं तरी तुमची लढण्याची तयारी आहे का? कारण निवडणूक आयोगाचा संपूर्ण निर्णय अद्याप लागलेला नाही. सध्या देण्यात आलेला निर्णय हा अंतरिम निर्णय आहे”, असा प्रश्न आदित्या यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “काय होतं हे बघणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार यांच्याबद्दल राहिलेला नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेसंदर्भात आहे. न्याय होणार आणि आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. संविधान आणि लोकशाहीबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मला वाटतं की फक्त देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे,” असं आदित्य म्हणाले.