‘लाडकी बहीण’नंतर लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांची घोषणा
‘लाडकी बहीण’नंतर लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांची घोषणा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरात लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. त्यामुळे आता बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी राज्यातील तरुणांसाठी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही, अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे बोलताना प्रत्युत्तर दिले.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे राज्य सरकार पैसे भरणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. अशा प्रकारची योजना आणण्याची इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपेंड देणार आहे. बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये, पदविकाधारक म्हणजेच डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला पुढे अधिक चांगली नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण कुशल कामगार मनुष्यबळ तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.