हृदयाचा प्रवास! अवघ्या ३४ मिनिटात हृदय कोल्हापुरात पोहचले अन्…
सांगली | अवघ्या 34 मिनिटात कोल्हापुरात जात हृदय मुंबईला रवाना झाले आहे. मेंदूचे काम थांबल्याने येथील एका उद्योजकाच्या अवयवदानाचा निर्णय कुटुंबीयांनी घेत त्याला पोलिस प्रशासनाने सहकार्य केले. ‘ग्रीन कॉरिडॉर’ने हृदय कोल्हापुरातून खास विमानाने मुंबईला तर इतर अवयव रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठविण्यात यश आले आहे.
उष:काल रुग्णालयात येथील उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी (वय ४५) यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ब्रेन डेड झाल्याने रुग्णालयाने कुटुंबीयांना विश्वासात घेत अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. कुटुंबीयांनीही तो मान्य केल्यानंतर याबाबतची तयारी करण्यात आली.
सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते पुणे या दोन मार्गांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या मोदानी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे व ब्रेन डेड असल्याने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण वर्षभरापासून कृत्रिम श्वासावर असून, त्यांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालयाकडे होती. त्यानुसार तिथे संपर्क साधत पुढील प्रक्रिया केली.
सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलिस प्रशासनाला आदेश दिल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ची तयारी करण्यात आली. हृदय ठराविक वेळेत मुंबईत पोहोचणे आवश्यक असल्याने कोल्हापूरच्या विमानतळावरून खासगी विमानाने ते पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी दुपारी हृदय कोल्हापूरसाठी नेण्यात आले. कोल्हापूर मार्गावर सुरूवातीला पोलिस गाडी, मध्यभागी रुग्णवाहिका आणि त्यानंतर हृदय ठेवलेली रुग्णवाहिका, शेवटी पोलिस गाडी असा निघालेला ताफा ३४ मिनिटांत कोल्हापूरात पोहोचला. त्यानंतर तात्काळ विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळी ५ च्या सुमारास हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रियाही मुंबईत सुरू झाली. इतर अवयव अडीच तासात पुण्यात दुसरीकडे इतर अवयव पुण्यात गेले.