‘कश्मीर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर हिंदु मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू’…- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : ‘कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशात हिंदू-मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. या चित्रपटाचा वापर तणाव वाढवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
राम नवमीच्या दिवशी राज्यासह देशभरातील विविध ठिकाणी दोन गटात हिंसाचार, तोडफोड करण्याचे प्रकार घडले होते. मुंबईतही मानखुर्द मध्ये दोन गटांमध्ये राडा झाला होता. या राड्यात 30 ते 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य महत्त्वाचे समजले जात आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, कश्मीर फाइल्स प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा अंदाज आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे. मुंबईत दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू असून त्यावर भाष्य करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.