“संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती…” मुख्यमंत्र्यांवर नाराज शिवसैनिकाने सोडला पक्ष

पुणे : शनिवारी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेते, राज ठाकरे तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी यांपर्यंत टीकास्त्र सोडले. त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली होती. मात्र संघावरच्या टीकेने त्यांच्याच पक्षातील एका नाराज शिवसैनिकाने पक्ष सोडला आहे. त्यांनी थेट शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पुण्यातील नेते आणि माजी शहरप्रमुख शाम देशपांडे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबत देशपांडे यांनी पत्रक काढून महिती दिली आहे.
त्यांनी काढलेल्या पत्रकात ते म्हणाले की, भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला असल्याची आपली भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली आहे. त्यामुळे मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे. असं शाम देशपांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
देशपांडे यांच्या अनिर्णायांनंतर शिवसेनेकडून त्यांना अप्रतिक्रिया मिळाली आहे. शिवसेनेने देशपांडे पक्षातून गेल्याने काडीचाही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना ही संघटना निष्ठावंतांची आहे, देशपांडेंना तीन वेळा महापालिकेत संधी देण्यात आली. स्थायी समितीचं अध्यक्षपद, गटनेता, शहरप्रमुख ही पदे आणि विधानसभेची उमेदवारी देऊनही ते समाधानी नव्हते. देशपांडेंनी कृतज्ञपणा दाखवण्याऐवजी कृतघ्नपणा दाखवल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले.