‘अग्निपथ’ आता सुप्रीम कोर्टात! योजना रद्द होणार का? लवकरच होणार सुनावणी

नवी दिल्ली : मागील महिन्यात केंद्र शासनाने लष्कर भरतीसाठी लागू केलेल्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. योजनेची घोषणा केल्यापासून लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी आंदोलने आणि जाळपोळ करून आपला विरोध या योजनेला दर्शवला. त्यावर केंद्र शासनाने काही बदल करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तरुणांकडून विरोध कायम आहे. विरोध होत असतानाही शासनाने नवीन योजनेनुसार भरतीप्रक्रिया सुरु केल्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली.
मिशन अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते एम एल शर्मा यांनी बोलताना “केंद्र सरकारने काढलेल्या अग्निपथ योजनेचे नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी आम्ही याचिका दाखल केलेली आहे. सरकारने नवीन योजना आणावी मात्र ती चुकीची की बरोबर हे अगोदर तपासले पाहिजे.” अशी प्रतिक्रिया दिली.
देशभरातील विद्यार्थ्यांकडून विरोध होत असताना देखील तिन्ही सेना प्रमुखांनी योजनेत बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आणि लवकरच अग्निपथनुसारच भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर अग्निपथ योजनेला विरोध म्हणून कोणत्याही आंदोलनात सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आलं होतं.
पुढील हप्त्यात या योजनेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर योजनेत काही बदल होतील की, योजना रद्द करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.