शेतकरी आंदोलनादरम्यानचे वक्तव्य भोवले; खासदार कंगना रणौतला नोटीस
आग्रा न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने कंगना यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.
या वर्षी ऑगस्टमध्ये कंगना यांनी म्हटले होते, की शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्या. बिल परत घेतले नसते तर नियोजन लांबले असते. आग्रा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता रमाशंकर शर्मा यांनी १३ सप्टेंबर रोजी खासदार-आमदार विशेष न्यायालयात कंगना यांच्या विरोधात याचिका दाखल केली. कंगनाने आंदोलनात बसलेल्या लाखो शेतकऱ्यांवर असभ्य टिप्पणी केली. त्यांना खुनी आणि बलात्कारी घोषित केले. इतकेच नाही, तर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसक तत्त्वाची खिल्ली उडवली होती.
कंगनावर भावना दुखावल्याचा आरोप करताना वकील म्हणाले, की मीही शेतकरी कुटुंबातील आहे. ३० वर्षे शेती केली. मला शेतकरी आणि राष्ट्रपिता यांच्याबद्दल आदर आहे. कंगनाने आमच्या आणि लाखो शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शर्मा यांनी सांगितले, की ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी पोलिस आयुक्त आणि न्यू आग्रा पोलिस ठाण्यात तक्रार पाठवून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात अधिवक्ता रमाशंकर शर्मा यांचे म्हणणे १७ सप्टेंबर रोजी न्यायालयात होणार होते; मात्र न्यायालयाने २५ सप्टेंबर ही तारीख दिली होती.