ऐश्वर्या रजनीकांत घरी दागिन्यांची चोरी; याप्रकरणी तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
![ऐश्वर्या रजनीकांत घरी दागिन्यांची चोरी; याप्रकरणी तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल rashtrasanchar news 2023 03 20T120604.379](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/rashtrasanchar-news-2023-03-20T120604.379-780x470.jpg)
चेन्नई | मूळचा मराठी असलेल्या, दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईत भेट दिली. यावेळी, त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेटही घेतली. त्यामुळे, रजनीकांत हे चर्चेत आले होते. आता, रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त समोर आहे. याप्रकरणी तीनमपेट पोलीस ठाण्यात ऐश्वर्या यांनी तक्रार दाखल केली आहे.
ऐश्वर्या यांच्या चेन्नईमधल्या घरातून डायमंड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या दागिन्यांची किंमत जवळपास 3.60 लाख रुपये असून 2019 मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नात तिने वापरले होते. हरवलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, अनकट डायमंड्स, अँटिक गोल्ड दागिने, नवरत्न सेट, अँटिक अनकट डायमंड आणि गोल्ड, आरम नेकलेस आणि बांगड्या यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात हे दागिने वापरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवल्याचं ऐश्वर्या यांनी सांगितलं. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी दागिने हरवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
एफआयआर कॉपीतील माहितीनुसार, ऐश्वर्या यांनी हे दागिने त्यांच्या लॉकरमध्ये ठेवले होते आणि घरकाम करणाऱ्यांना याविषयीची माहिती होती. घरकाम करणाऱ्या तीन जणांवर ऐश्वर्या यांनी संशय व्यक्त केला आहे. घरातील काही स्टाफलाही दागिन्यांबद्दल माहिती होती. ऐश्वर्या घरात नसताना स्टाफला तिच्या घरात ये-जा करण्याची परवागनी होती. याप्रकरणी सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.