“बोम्मईंच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला…”; अजित पवारांचं टीकास्त्र

मुंबई | Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला आहे, असं अजित पवार म्हणाले. 17 डिसेंबरला महामोर्चासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी, असंही अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “बसवराज बोम्मई यांनी दिल्लीतील बैठकीत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी. बोम्मईंनी जे ठरलंय त्याप्रमाणे वागलं पाहिजे. राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल, असं आम्ही कधीच वागलो नाही. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं तर हा वाद वाढला नसता. बोम्मईंच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं.”
“गृहमंत्र्यांनी बुधवारी बैठक बोलवली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. बोम्मई यांनी महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं तर वाद झाला नसता. कारण नसताना त्यांनी वाद निर्माण केला. त्यामुळे महाराष्ट्र सीमेवरील गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. सीमेवरील गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचं मत व्यक्त केलं. ही भावना पण राज्याच्या दृष्टीने अडचण निर्माण करणारी आहे. कर्नाटकनं समंजस भूमिका घेतली पाहिजे. दोन्ही बाजूंनी समजून घेणं गरजेचं आहे”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.