‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले, “माझ्याकडून बोलण्याच्या ओघात…”

पुणे | Ajit Pawar – काल (6 जानेवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला होता. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुलेंऐवजी सावित्रीबाई होळकर असं म्हटलं होतं. तसंच त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच अजित पवारांनी यावर माफी मागावी, अशी मागणी देखील केली आहे.

या पार्श्वभूमीवर आज (7 जानेवारी) अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी माफी मागितली. अजित पवार म्हणाले की, “कधी-कधी बोलण्याच्या ओघात माणसाकडून चूकभूल होत असते. पण याचा प्रसारमाध्यमांमध्ये एवढा मोठा गवगवा केला जातो. सावित्रीबाई फुले यांना मी चुकून सावित्रीबाई होळकर म्हणालो, यामध्ये मी असा काय मोठा गुन्हा केला आहे. ज्यामुळे अनेकांचं आकाश पाताळ एक झालंय, खरं तर मी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय, त्यामुळे माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. पण बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ती चूक झाली.”

“मी आहिल्याबाई होळकर यांनाही तसंच बोललो आणि सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख फुले म्हणण्याऐवजी होळकर असा केला. माझी चूक मला लक्षात आल्यानंतर मी लगेच दिलगिरी देखील व्यक्त केली. जिथे आपल्याकडून चूक होते, तिथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायचं असतं, असं आपल्याला वडिलधाऱ्यांनी शिकवलं आहे. यामुळे कुणाचं काही बिघडत नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

Sumitra nalawade: