‘मुख्यमंत्री अजितदादा पवार’; निकालापूर्वीच पुण्यात लागले विजयाचे बॅनर
पुणे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. संतोष नांगरे यांचे समर्थक करण गायकवाड, कायर्कर्त्यांनी उत्साहात पर्वती मतदारसंघात बॅनर लावले आहे. त्यात मुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
राज्यात काल विधानसभा निवडणुकेची मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार? हे मात्र उद्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? यावर चर्चा रंगू लागल्या असताना पुण्यात मात्र अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागलेले दिसून येत आहे.
महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार सर्वात कमी जागा लढल्या होत्या त्यामुळे एक्झिट पोलमध्ये सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आमदारांची संख्या कमी जास्त झाली तर अजित पवार हे किंगमेकर ठरु शकतात.
एक्झिट पोलच्या अंदाजांवर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात अजित पवार गटाला ३५ ते ४० जागा मिळतील. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर ठरणार आहेत. असा दावा त्यांनी केला. राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून निसटत सरकार महायुतीतचे येणार असा दावा आमदार मिटकरी यांनी केला आहे.