अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात, जयंत पाटलांचा खळबळजनक दावा
पुणे | Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटाबाबत (Ajit Pawar Group) मोठा दावा केला आहे. अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसोबत माझी चर्चा झाली आहे. मला त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आहे. आम्ही मनापासून शरद पवारांसोबत आहोत, असं मला त्यांनी सांगितलं आहे. तसंच सध्या थोडा दबाव आहे त्यामुळे आम्ही इकडे राहतोय. पण आम्ही आतून पवारसाहेबांसोबतच आहोत, असंही त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे दिसतं तसं नसतं, खरी परिस्थिती वेगळी आहे, असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला आहे.
राज्यातील जनतेनं भाजपला हटवायचं ठरवलं आहे. त्यांनी आमचा पक्ष तोडून लोकांना मंत्रिमंडळात घेतलं. आमच्यातले लोक त्यांनी तोडून त्यांच्यासोबत नेले. पण आमच्यासोबत जनता आहे. महाराष्ट्रातील 80 टक्के लोकांनी शरद पवारांच्या बाजूनं अॅफिडेव्हिट दिलं आहे. त्यामुळे पक्ष आमचाच आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.