अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? संजय राऊत स्पष्टच बोलले; म्हणाले, “ते फार दिवस…”
मुंबई | Sanjay Raut – उद्या (22 जुलै) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा 64 वा वाढदिवस आहे. पण अजित पवार यांनी इर्शाळगडाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स लावले आहेत. यातील काही होर्डिंग्सवर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी उपमुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, “सध्या अजित पवार हे भावी आहेत याचा अर्थ ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मला देखील राजकारण माहिती असून काय घडामोडी घडत आहेत ते माहिती आहे. मग त्या राजकीय घडामोडी असतील, कायदेशीर असतील अथवा घटनात्मक असतील. अजित पवार हे भावी मुख्यमंत्री आहेत यात काही शंका नाही. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे.”
“अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त काही होर्डिंग्स लागलेत की नाही याबाबत मला माहिती नाही. मी ते पाहिलं देखील नाही. पण लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे सत्य आहे आणि हे सत्य शिंदे गटानं स्विकारायलं हवं”, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.