देश - विदेश

दादा भले – बुरे

चंद्रकांतदादांच्या गच्छंतीनंतर भाजपमध्ये दुखवटा पसरला, तर अजितदादांच्या गटात चैतन्य पसरले. कार्यकर्त्यांची राजी-नाराजी, निष्ठा, दादांचा दबाव-रुबाब याहीपेक्षा सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून दादांची गच्छंती आणि आगमन कसे हिताचे आहे या दृष्टीतून या बदलांकडे पाहिले पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे जुनेजाणते एकनिष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना डच्चू देत पुण्याचा कारभार आता अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. यावरून सध्या बरेच अंतर्गत रणकंदन माजले आहे. भाजपच्या गोटामध्ये, त्यातही चंद्रकांतदादा यांच्या कोथरूडच्या खास गोटामध्ये दुखवटा साजरा केला जात असून, दादांच्या गोटात मात्र नवचैतन्य पसरले आहे.

कोथरूडकरच नव्हे तर पुणेकरदेखील या बदलाकडे बारकाईने पाहात आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे यामुळे मनोधैर्य खचले असून, अजितदादांचा शब्द आता येथे चालेल अशी एक ओरड सध्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. राजकारणामध्ये अजितदादांचे प्राबल्य वाढल्याचे हे लक्षण मानले जाते. यावरूनदेखील भाजपवाले धास्तावले आहेत. दबावाने दादांनी हे पद पदरात पाडून घेतले, अशीही ओरड सुरू आहे. सर्वसामान्यांच्या नजरेतून पाहिले तर खरोखरच चंद्रकांतदादा जाऊन अजितदादांचे पर्व येथे सुरू होणे हे हिताचे आहे का? याबाबत मात्र सर्वसामान्य पुणेकर सजग असतील यात संदेह नाही.

चंद्रकांत पाटील यांच्या पालकमंत्रिपदाखाली अनेकांना ‘पालकमंत्री’ जवळून अनुभवता आले, कार्यक्रमाला हक्काने उपस्थित राहणारा नेता मिळाला, गोडीगुलाबीने नांदवणारा, त्यांचे लाड करणारा हक्काचा नेता त्यांना मिरवता आला, परंतु पुणेकरांचे यात कल्याण झाले का, हा खरा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांच्या मुजोरीपासून ते रखडलेल्या अनेक विकासकामांपर्यंत खरोखरच चंद्रकांत पाटील हे प्रभावी ठरले का? हा प्रश्न यानिमित्ताने विचार करायला लावणारा आहे. गेल्या दोन वर्षभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सर्वार्थाने विकासाची जबाबदारी पालकमंत्र्यावर पडते. अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील खरोखरच किती प्रभावी ठरले हा संशोधनाचा विषय आहे. कोथरूडमधील चार निष्ठावंत कार्यकर्ते मिरवायचे आणि डेंटिस्टच्या दवाखान्यापासून ते सणासुदीच्या महोत्सवापर्यंत भाषणबाजी छान करायची यापलीकडे आमचे जीवनमरणाचे, रोजचे जगण्याचे प्रश्न सुटले का, हेदेखील पाहणे गरजेचे आहे.

महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, अरेरावी आणि निष्काळजीपण इतका वाढला की, दररोज याबाबत तक्रारी होऊनदेखील काहीच फरक पडेना. चंद्रकांत पाटील हा तसा भोळाभाबडा, भला माणूस आहे. त्यांनी कधी आवाज चढवून एखाद्या ठेकेदाराला, अधिकाऱ्याला जाब विचारला असे ऐकिवात नाही. भाजपचे लाळघोटेपण करणारे दोन-चार ठेकेदार सोडले तर फारसे कोणी त्यांच्याजवळ जाऊन फार मोठ्या विकासाचे तीर मारल्याचे ऐकिवात नाही. एकतर इथे चंद्रकांत पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक सुप्त संघर्ष आहे. त्याचा फटका केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर विकासकामांनादेखील बसतो. परवाच्या पावसामध्ये प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले. रात्रीत चंद्रकांतदादांच्या आदेशाने या पाण्याचा निचरा झाला, याचे व्हिडीओ व्हायरल झाले, पण कोथरूडसारख्या मध्यवस्तीत साधे ड्रेनेज सिस्टिम सक्षम करता येईना का? रस्त्यावरचे खड्डे असो, रखडलेली मीटर असो, भिडे वाड्यासह अनेक प्रलंबित प्रश्न असो, पुण्याचा सर्वांत महत्त्वाचा पाणी प्रश्न असो किंवा वाढीव कोटा असो एकाही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रश्नाकरिता कोथरूडकरांना झगडावे लागावे, तर बाकी पुणे शहर आणि तालुक्याचे काय? याउलट अजित पवार हे प्रसंगी अरेरावी किंवा एकाधिकारशाहीने वागणारे वाटले तरी त्यांचा अधिकाऱ्यांवर कमालीचा दबाव आहे. ते केवळ स्वतः पहाटे उठत नाहीत तर अधिकाऱ्यालाही पहाटे कामाला लावतात ही त्यांची खासियत आहे. आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये महापालिकेचे अधिकारी वठणीवर येतील. सर्वसामान्य माणसाच्या कामालादेखील ते प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे. बैठकांचा धडाका आणि सामान्यांचे विकासाचे प्रश्न दादा आपल्या जरब असलेल्या खास शैलीमधून अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाकडून करून घेतील, अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.

आता राजकारणाच्या बाबत म्हणाल तर एकूणच पुण्यावरचा वरचष्मा वाढवण्यासाठी राष्ट्रवादीला बळ मिळेल आणि तेथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल असे मानले जाते, परंतु शेवटी खच्चीकरण म्हणजे निधीची खिरापत असते, यापलीकडे कार्यकर्त्यांची मागणी नेमकी काय असते. रस्त्याचे ठेके, पाणीपुरवठ्याचे ठेके, महापालिकेतील कामे हाच तर कार्यकर्त्यांचा संघर्ष असतो. सामान्यांच्या विकासकामांचे कार्यकर्त्यांना काय पडले असते? अर्थात राष्ट्रवादीमध्ये हेच आहे. आता फक्त ठेकेदार बदलतील, एजन्सी बदलतील, परंतु दादा पर्व हे त्यातल्या त्यात धाडसाचे, जाब विचारणारे, २४ तास कार्यरत राहणारे आणि धाक निर्माण करणारे असेल. जेणेकरून सामान्य लोकांचे प्रश्न लवकर सुटतील, ही पुणेकरांची अपेक्षा आहे. पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांच्या भावना, जुनंजाणतं निष्ठेपण यापेक्षा आमच्या जीवनमरणाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी हा बदल आम्ही आनंदाने स्वीकारू.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये