“जाहिरातीत पंतप्रधान अन् स्वत:चा फोटो, पण बाळासाहेब, दिघेंचा विसर”, पवारांनी शिंदेंना डिवचलं

मुंबई : (Ajit Pawar On Eknath Shinde) ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहीरात शिंदे गटाने आज सर्व प्रसिद्ध वृत्तमानपत्रांमध्ये केली. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर करून शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.
यावर बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “शिंदे साहेब इतक्या लवकर कसे काय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले मला काय कळलं नाही. मुळातच हा पक्ष त्यांनी स्वतःकडे का घेतला? कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत, असं म्हणत त्यांनी पक्ष स्वतःकडे खेचून घेतला. परंतु त्या जाहिरातीवर कुठे आनंद दिघेंचा फोटो दिसेना, कुठं बाळासाहेबांचा फोटो दिसेना झाला आहे असं ते म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, मुळात जाहिरात कशासाठी केली जाते, जेणेकरून आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचावी. पण यांनी केवळ स्वतःची प्रसिद्धी केली आहे. शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीत मोदी साहेबांचा फोटो टाकला आहे. स्वतःचाही फोटो टाकला, पण बाळासाहेबांचा फोटो सोईस्कररित्या वगळला आहे. राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पद्धतशीरपणे यांनी बाजूला ठेवले आहेत.