राजकीय जीवनात कोणत्या चुका केल्या? अजित पवार म्हणतात, “एक मोठी चूक वाटते की २००४ मध्ये…!”
मुंबई : (Ajit Pawar On Sharad Pawar) राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि सडेतोड स्वभावामुळे परिचित आहेत. यामुळे अजित पवार अनेक वेळा वादात सापडल्याचंही दिसून आलं आहे. एका मुलाखतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची अशीच चर्चा आता सुरू झाली आहे. राजकीय जीवनात कोणत्या चुका केल्या असा प्रश्व विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “ते आता सांगण्यात अर्थ नाही. पण एक मोठी चूक वाटते की २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं. कुणालाही मुख्यमंत्री करायचं होतं. आर. आर. पाटील, छगन बुजबळ किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात जे होते त्या कुणालाही करायला हवं होतं”.
“तेव्हा आम्ही क्लिअर होतो. पण त्यावेळी आमच्या निर्णय प्रक्रियेत बोलणारे कोण होते? आमचे सर्वोच्च नेते, प्रफुल्लभाई, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह पाटील हे आमचे नेते होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं असं होतं”, असं अजित पवारांनी यावेळी सांगत या चुकीसाठी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि पक्षातील त्या वेळच्या इतर वरीष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, यावेळी अजित पवारांना २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपद आल्यास काय कराल? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. “आत्याबाईला मिशा असत्या तर छान झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे. झाल्यावर दाखवतो काय करायचंय ते”, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.