राज्यातील पोलीस तणावाखाली, अधिकाऱ्यांवरही दबाव; अजित पवारांचा सरकारवर आरोप

मुंबई : (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचाळवीरांना आवरावं असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलिस तणावाखाली असून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना थेट सीएमओ कार्यालयातून आदेश येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रशासनात म्हणावं तसं काम होताना दिसत नाही. प्रशासन पुर्णपणे ठप्प झालं आहे. महिना दिड महिना दोनचं लोकांनी राज्याचा कारभार चालवला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करुन 18 लोकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. तरी पण लोकांची कामं होताना दिसत नाहीत.
सध्या राज्यातील पोलिस प्रशासन प्रचंड दबावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात आणि अन्याय होत असला तरी पोलीस बोलून दाखवतात की आमचा नाईलाज आहे, आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नसून शरमेची बाब आहे. गेल्या चार महिन्यापासून सुरु झालेली ही परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला काहीच वेळ लागणार नाही असा इशारा अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या न्यायालयीन सुनावणीनंतर राज्य सरकारला दिला आहे.