मुंबई : (Ajit Pawar On Tanaji Sawant) बुधवार दि. 17 ऑगस्ट पासून राज्याच्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या उपरोधित घोषणांमुळे. मात्र, दुसऱ्या दिवशी सभागृहात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिंदे सरकारकडे उत्तर नसल्याने पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की ओढावली.
दरम्यान, नवनिर्वाचित आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी यावर प्रश्न केला होता. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही माहिती नसल्याने हा प्रश्न राखून ठेवण्याची वेळ आली.
ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न समोर आला. या सर्वेक्षणातून 80 बालकांना हत्तीरोगाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील तब्बल 29 बालकांना या रोगाची लागण झाली होती. यासंदर्भात अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला होता, मात्र यावर सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत हा प्रश्न आरोग्यमंत्र्यांनी राखून ठेवला आहे.