दादांची कात्रज दूध संचालकांवर दादागिरी …
पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची अर्थात कात्रज डेअरीचे वार्षिक साडेसात कोटी लिटर दूध संकलन असतानाही संस्था तोट्यात का आली. असा प्रश्न पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कात्रज डेअरीच्या संचालकाला विचारला. संस्था तोट्यात असताना प्रति लिटर एक रुपया दूध फरक (बोनस) द्यायचा निर्णय का घेतला? शेतकऱ्यांचे दुधाचे पैसे वेळेवर का दिले जात नाहीत? असं विचारत संचालकाला अजित पवार यांनी खडसावले.
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी शेतकऱ्यांचे दूध बील वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार अजित पवार यांच्याकडे केली होती दूध संघ तोट्यात येईपर्यंत संचालक मंडळ काय करत होते? संचालक मंडळाचे मंडळाचा दैनंदिन कारभारावर लक्ष नाही का? शेतकऱ्यांची दूध बिले वेळेवर का मिळत नाहीत? बिले वेळेवर देण्यासाठी योग्य ती तरतूद करा. संघात संघाचा नफा इतका कमी का झाला? तोटा का होत आहे, कुठे नुकसान होत आहे, त्याचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करा.
संघ अडचणीत असताना प्रति लिटर दूध फरक किंवा दिवाळी बोनस एक रुपया देण्याचा का निर्णय घेतला, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. संचालक मंडळ काय काम करते, हे मला कळले पाहिजे. संचालक मंडळाची बैठक होणाऱ्या बोर्ड रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि त्याचे रेकॉर्डिंग मला दर महिन्याला पाठवा, म्हणजे कोण संचालक काय काम करतो. हे मला कळेल असेही अजित पवार म्हंटल्याचे एका जेष्ठ संचालकाने सांगितले.