नितेश राणेंच्या टीकेला अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, “टिल्ल्या लोकांनी…”

मुंबई | Ajit Pawar On Nitesh Rane – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील सत्ताधाऱ्यांनी केली आहे. अशातच औरंगजेब क्रूर असता, तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जितेंद्र आव्हाडांना पत्र लिहित, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आपण औरंगजेबाबाबत ‘औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना?’ असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झाले नाहीत किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नाहीत असं घोषीत करतो,” असं म्हणत नितेश राणेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली आहे.
यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं आहे. “टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची किती, झेप किती त्यांना मी कशाला उत्तर देऊ. त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील. मी असल्या लोकांच्या नादी लागत नसतो,” असं खोचक प्रत्युत्तर पवारांनी नितेश राणेंना दिलं आहे.
One Comment