“कुठंतरी पाणी मुरतंय…”, अजित पवारांचा शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा

पुणे | Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government – “राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी जो घटनाक्रम झाल्याचं दिसून येतंय, ते सर्व पाहता कुठंतरी पाणी मुरतंय आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे, हे त्रिवार सत्य आहे.”, अशी सूचक टिप्पणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसंच, “फोडाफोडी करून जे मिळवलं आहे, ते औट घटकेचं आहे, हे लवकरच मुख्यमंत्र्यांना कळेल.”, असंही ते म्हणाले.
खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “15 दिवसांत शिवसेना आमदारांनी त्यांची भूमिका बदलली. ते रडीचा डाव खेळले. सुरूवातीला म्हणाले आमचा दुरान्वये संबंध नाही. काय चालले आहे, हे आम्हालाच माहिती नाही. नंतर हे सगळे सूरतला पोहोचले. तेथे त्यांना कडेकोट बंदोबस्त कसा मिळाला? गुजरात सरकारने संरक्षण देऊन त्यांची बडदास्त का ठेवली? नंतर ते गुवाहाटीला कशाप्रकारे गेले. तेथे त्यांना कसा बंदोबस्त मिळाला. तिथून ते गोव्याला गेले. तिथेही बंदोबस्त मिळाला. या तीनही ठिकाणी कोणाची सरकारे होती? एकीकडे ते फोडाफोडी करत होते, तर दुसरीकडे आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत होते. अशातच देवेंद्र फडणवीस वेष बदलून घराबाहेर जायचे, हे त्यांच्या पत्नीनेच उघड केले. फोडाफोडी करून ज्यांनी सत्ता मिळवली. ती औटघटकेची आहे, हे लवकरच त्यांना कळेल.”
पुढे अजित पवार म्हणाले, “आत्ताच मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला जातो. कागद लिहून काय बोलायचं ते त्यांना सांगितलं जातं. ही तर सुरूवात आहे. नव्याचे नऊ दिवस अजून संपायचे आहेत. पुढे मुख्यमंत्र्यांना बरंच काही पहावं लागणार आहे. पक्षांतर केलेले नेते जनतेला आवडत नाहीत. पुढच्या वेळी मतदार त्यांना नाकरतात, हे यापूर्वी अनेकदा दिसून आलेलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं,” असं अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटलं आहे.