अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? हसन मुश्रीफ स्पष्टच बोलले; म्हणाले, “फक्त पोस्टर्स लावून…”

मुंबई | Hasan Mushrif – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज (22 जुलै) 64 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्सवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही असंच एक ट्विट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच अजितपर्व..”
यादरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना अजित पवारांच्या होर्डिंग्सवरील भावी मुख्यमंत्री या उल्लेखाबाबत विचारण्यात आलं. यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, “फक्त होर्डिंग्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी 145 आमदार लागतात ही गोष्ट अजित पवारांनी स्वत: कार्यकर्त्यांना सांगितली आहे.”