“शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्षही चालवला”, अजित पवार गटाचा मोठा दावा
नवी दिल्ली | Ajit Pawar Vs Sharad Pawar – आज (9 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) राष्ट्रवादी (NCP) कोणाची? यावरून पुन्हा सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणीला शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) वकील निवडणूक आयोगात उशिरा पोहोचल्याने सुनावणीला पंधरा मिनिटे उशिराने सुरूवात झाली. तसंच आज अजित पवार गट युक्तिवाद करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शरद पवार गटाचा युक्तिवाद निवडणूक आयोग ऐकणार आहे. तर आता अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) मोठा युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादाला अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी सुरूवात केली.
अजित पवार गटाने युक्तिवाद करताना म्हटलं की, विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे आहेत. आमच्याकडे दीड लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. राज्यातील आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार गटानं केला आहे.
शरद पवार यांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. त्यांनी सर्व नियम पायदळी तुडवले आहेत. एका सहिनं नियुक्ता केल्या जायच्या. पक्षामध्ये यापूर्वीच्या संघटनात्मक नेमणूका कायद्याला धरून नव्हत्या, असा दावा अजित पवार गटानं केला.
अजित पवारांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड योग्य आहे आणि कायद्याला धरून आहे. पक्षावर एकच व्यक्ती दावा करू शकत नाही. अंतर्गत लोकशाही पक्षामध्ये नाही. पक्षांतर्गत झालेल्या नियुक्ता निवडणुकीनुसार झालेल्या नाहीत, असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्यासोबत आहेत. त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या असून आमची बाजू भक्कम आहे, असा दावा अजित पवार गटानं केला. एक व्यक्ती निवडून न येता ती व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करत होती. हे योग्य आहे का? शरद पवार हे एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कशी? तर अजित पवार गटाची नियुक्ती ही कायदेशीर आहे, असा दावाही अजित पवार गटानं केला.