“…यांना जनाची नाही, तर मनाची तरी वाटली पाहीजे”, अधिवेशनात अजित पवार संतापले

मुंबई | Ajit Pawar – आज (15 मार्च) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर प्रचंड संतापले. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी वाटली पाहीजे अशी टीकाही त्यांनी केली. तसंच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांवरही (Chandrakant Patil) त्यांनी हल्लाबोल केला.
यावेळी अजित पवार म्हणाले, “आम्ही अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना अध्यक्षांना रात्री येऊन विनंती केली की 10 वाजेपर्यंत चर्चा घ्या. अध्यक्षांनीही ती मागणी लगेच मान्य केली. ही चर्चा सुरू असताना काहीवेळा मंत्री हजर नव्हते. ते सारखे बाहेर जात होते. जर एखादा मंत्री बाहेर गेला तर सभागृह लगेच थांबवावं लागतं. तरीही आम्ही ते मंत्री वॉशरुमला, पाणी प्यायला, चहा घ्यायला गेले असतील असं म्हणत समजून घेतलं.”
“जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा सकाळी 9 वाजता इथं येऊन बसायचो. ही मी माझी फुशारकी सांगत नाही. पण, आम्हीही गेली 30-32 वर्षे या सभागृहाची परंपरा कशी चालत आलीये ते पाहीलंय. आमच्यानंतर देखील बाकीच्यांनी ही परंपरा राखली पाहिजे. या विधिमंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो,” असं अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आज अधिवेशनाचं कामकाज सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जास्त व्याप असतो याची मला जाणीव आहे. जरी ते नसले तरी किमान संसदीय कामकाज मंत्र्यांनी तरी सकाळी साडेनऊ वाजता येऊन बसलं पाहिजे. माझा चंद्रकांत पाटलांवर आरोप नाही, पण त्यांनी जबाबदारी घेतली आहे, तर त्यांनी सभागृहात येऊन बसावं.”
“विधीमंडळाच्या कामकाजात मंत्र्यांना अजिबात रस नाही. त्यांना बाकीच्या कामातच रस आहे. यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. असं बोलायला आम्हालाही योग्य वाटत नाही. पण मंत्र्यांनी सभागृहातील कामाकाजाला महत्त्व द्यायला हवं”, असंही अजित पवार म्हणाले.