मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी मोठा गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले
वर्धा : (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) वर्धा (wardha) येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत असतांनाच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. यावेळी महिलाही आक्रमक दिसून आल्या. यावेळी प्रेक्षकांमधून अचानक महिला आणि पुरुषांनी वेगळा विदर्भ झालाच पाहीजे, शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहीजे, बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. त्या तरुणांच्या आत्महत्या थांबल्याच पाहीजे अशा घोषणा देणे सुरु केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला अन् मुख्यमंत्री शिंदेंना काही वेळ बोलताना थांबाव लागलं.
दरम्यान, यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना घोषणाकारांनी म्हटलं की, राज्याचे मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त आहेत. तसंच सरकार स्थापन करुन खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखवत आहेत. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी कागदं देखील भिरकावली. यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्याकडे देखील लक्ष वेधले गेले.
दुसरीकडे वेगळा विदर्भ राज्य करुन विदर्भातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा. देशासह राज्यात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्यात जात आहे. त्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी या विषयांवर बोलण्याची गरज असताना सरकार कसं पाडलं आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली.