अकोला पश्चिमचे भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन
अकोला | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार तथा माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाच्या आजाराने शुक्रवारी रात्री अकोल्यात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. अकोल्यातून सलग 29 वर्षे त्यांनी भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला होता. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ते कार्यरत होते. गोवर्धन शर्मांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते. जवळपास 15 दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथून अकोला येथील त्यांच्या घरी आणले होते. आज रात्री प्रकृती चिंताजनक होऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरी हितचिंतकांची एकच गर्दी झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, कृष्णा व अनुप ही दोन मुले, सून, नातवंडासह मोठे आप्त परिवार आहे.