आजोबांच्या निधनानंतर आलिया भट्टची भावनिक पोस्ट; म्हणाली, “शेवटच्या क्षणापर्यंत…”

मुंबई | Alia Bhatt – प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) आजोबा नरेंद्र राजदान (Narendra Razdan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र राजदान हे आजारी होते. तसंच मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नरेंद्र राजदान यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. अखेर आज (1 जून) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आजोबांच्या निधनानंतर आलिया भट्टवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं आजोबांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आलिया तिच्या संपूर्ण कुटुंबासह आजोंबाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं ‘माझे आजोबा, माझे हिरो’ असं कॅप्शन दिलं आहे.
ही पोस्ट शेअर करत आलियानं म्हटलं आहे की, “93व्या वर्षांपर्यंत गोल्फ खेळले, 93व्या वर्षापर्यंत त्यांनी काम केलं, माझ्यासाठी ऑम्लेट बनवलं, मला छान गोष्टी सांगितल्या, त्यांनी नातीसोबत खेळण्याचा आनंद घेतला..त्यांनी क्रिकेटवर, स्केचिंगवर आणि कुटुंबावर प्रेम केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याचा आनंद घेतला. माझं हृदय दु:खानं भरलेलं आहे पण त्यासोबतच आनंदानंही भरलं आहे. कारण माझ्या आजोबांनी नेहमी आम्हाला आनंद दिला. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते.”