ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

मुंबई | गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Rain), गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्दरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये