“…ही उरलेली अब्रु वाचवण्याची धडपड आहे”, अंबादास दानवेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका

मुंबई | Ambadas Danve – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका केली जात आहे. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यादरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. तर राज्यपाल यांनी लिहलेल्या पत्रावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिलं आहे. “महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे”, असं त्यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, आता यावरून अंबादास दानवे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यातील जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण दिलं जात असून हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार असल्याची टीका दानवेंनी केली आहे.
अंबाजास दानवे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणं हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे. माफीवर हा विषय आता थांबणार नाही. या राज्यपालांची हकालपट्टीच व्हायलाच हवी. दिल्लीला केलेलं पत्रलेखन ही उरलेली अब्रु वाचवण्याची धडपड आहे. महाराष्ट्राचं मीठ खाऊन येथील मातीला दूषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे केंद्र आणि राज्यपालांनी ध्यानी ठेवावं”, असा इशाराही दानवेंनी दिला आहे.