ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“गती कमी होताच कळतं, दिशाच वेगळ्या आहेत;” अमोल कोल्हेंच्या पोस्टने पुन्हा चर्चांना उधाण!

पुणे : (Amol Kolhe On Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे मागील महिन्यांपासून सातत्याने आपल्या पक्षविरोधी भुमिकांमुळे चर्चेत आहेत. केंद्रासह राज्यातील भाजप नेत्यांसोबत वारंवार होणाऱ्या भेटीगाठी आणि त्यानंतर त्यांच्याकडूव केली जाणारी सूचक राजकीय वक्तव्ये यामुळे कोल्हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा रंगताना दिसत आहेत.

अशातच अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा आपल्या सुचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘जोपर्यंत गती आहे तोपर्यंत चक्र एकाच दिशेने भासतात, पण गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत. याला निसर्गाचा नियम म्हणायचं की सगळीकडेच असं असतं? आयुष्य, करिअर, राजकारण…गती कमी झाल्यानंतर दिशा कळते,’ अशा मजकुरासह त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एकीकडे राष्ट्रवादीतील नाराजीची चर्चा आणि भाजप नेत्यांसोबत वाढलेल्या जवळीकीबद्दल चर्चा होत असतानाच राजकारणाचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांनी दिशेबाबतचा संभ्रम व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संसदेत निवडून गेल्यानंतर वारंवार केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडणारे अमोल कोल्हे हे मागील काही महिन्यांपासून विविध भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसत आहे. कोल्हे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगनिमित्त ही भेट घेतल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र नंतरच्या काळातही महाराष्ट्र भाजपमधील विविध नेत्यांना ते भेटत राहिले. तसंच पुढील राजकीय प्रवासाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेचीही चांगलीच चर्चा झाली होती.

‘मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही, वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं,’ असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये