नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला अमोल कोल्हेंच प्रत्युत्तर; म्हणाले, “जे वडिलांच्या कर्तृत्वावर…”

मुंबई | Amol Kolhe – भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. 2024 साली अमोल कोल्हेला पराभूत करून टाकू, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. ते काल (11 जानेवारी) वर्धा येथे एका जाहीर सभेत बोलत होते. दरम्यान, राणेंच्या या टीकेला आता अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, कोण नितेश राणे? कुठल्या पक्षात आहेत ते? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
नितेश राणेंना भाजपच (BJP) किंमत देत नाही. जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजतात, त्यांचे बोलताना संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा, असा खोचक टोला अमोल कोल्हेंनी लगावला. तर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, मी उजळ माथ्यानं सांगतो की कला क्षेत्र हे माझ्या उत्पन्नाचं साधन आहे, असंच राणेंनी देखील सांगावं असं आवाहन कोल्हेंनी राणेंना केलं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, महाराष्ट्रच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचा आदर्श आहे, असंही कोल्हे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
“तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करतो. त्याला सिरियलसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. 2024 साली त्याला पराभूत करून टाकू. त्याला दाढी काढल्यावर कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरियल पुरताच आहे”, अशी टीका नितेश राणेंनी केली होती.