“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचं सूचक ट्विट!

मुंबई | Amol Mitkari On Shinde Government – आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होतेय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. एकीकडे शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सुनावणीच्या अनुषंगाने एक सूचक ट्विट केलं आहे.
अमोल मिटकरींनी ट्विटमध्ये न्यायालयात सध्या सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ दिला आहे. “उद्या 16 आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल.. न्यायदेवता न्याय देईलच”, असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे. तसंच त्यांनी केलेल्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आज न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला आहे. 20 जूनपासून सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. 10व्या परिशिष्टानुसार फुटीची मान्यता नाही. जर पक्ष सोडला नव्हता, तर व्हीपचं पालन का केलं नाही?, असा सवाल सिब्बल यांनी मांडला आहे. 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे. 10व्या परिशिष्टानुसार शिंदे गटला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. 10व्या अनुसूची नुसार त्यांना दुसरा पर्याय नाही, असंही सिब्बल म्हणाले आहेत.