नंदुरबार : (ambulance carrying 11 pregnant mothers Accident) जिल्ह्यातील एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला असून त्यामध्ये तब्बल 13 गरोदर महिलांना जनावरांसारखे कोंबण्यात आलं होतं. या अपघातामध्ये कोणालाही जीवीतहानी पोहोचली नसली तरी या निमित्ताने प्रशासनाचा गलथान प्रकार समोर आला. सदरील गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी घेऊन जात असताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडे जवळ हा भीषण अपघात झाला.
दरम्यान, धडगाव या अतिदुर्गम भागातील तेलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून या महिलांना सोनेग्राफीसाठी तेलखेडी या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका घेऊन आली होती. सोनोग्राफी झाल्यानंतर परत घेऊन जात असताना, भरधाव वेगात असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये 14 जण जखमी झाले असून त्यातील 13 गरोदर महिलांचा समावेश आहे.
खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना शहादा येथील नगर पालिकेच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे. या अपघाताची शहादा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून, पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची? याचाही शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे रुग्णवाहिका चालकांच्या बेदरकारपणे वाहन चालवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालय चालकांना आपत्काळ नसताना रुग्णवाहिका मर्यादित वेगात चालवण्याबाबत निर्देश देणे आता गरजेचे झाले आहे.