क्राईमताज्या बातम्यापुणे

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकावर कोयत्याने वार

रस्त्यावर सुरू असलेला वाद सोडवण्यास मध्यस्ती करणाऱ्या वानवडी पोलीस स्टेशनच्या एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन आरोपी तरुणाना अटक करण्यात आली आहे.

निहाल सिंग मन्नू सिंग टाक (वय १८,रा. हडपसर) आणि राहुल सिंग उर्फ राहुल रवींद्रसिंग भोंड (वय १९,रा. हडपसर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी, की आज दुपारी चारच्या दरम्यान न्यू रॉयल ऑटो गॅरेजच्या समोर ससाणे नगर रेल्वे गेटच्या जवळ एक मोटरसायकल चालक व त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या मोटरसायकलवरील निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबर असलेल्या राहुलसिंग याच्यासोबत वाद झाला. यावेळी निहालसिंग आणि राहुल सिंग यांनी होंडा एक्टिवावरील इसमांना कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या प्रकारा दरम्यान वानवडी पोलीस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड हे तेथून जात असताना त्यांनी हे भांडण पाहताच आपली गाडी थांबवून वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती केली. कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी त्यांनी निहालसिंग याच्याकडून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना निहालसिंगने त्याच्याकडील कोयता रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला. तो कोयता त्यांच्या डोक्यात लागला असून त्यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली. तसेच कोयता मारणारा निहालसिंग आणि राहुलसिंग दोघेही तेथून सय्यद नगर कडे पळून गेले.

या दोघांनाही वानवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर या आधी देखील विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी निहाल सिंग मन्नू सिंग टाक याच्यावर घरफोडी, दरोडा, चोरी, शरीराविरुद्ध, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण 20 गुन्हे तर राहुल सिंग याच्यावर घरफोडी, दरोडा, चोरी, शरीराविरुद्ध, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, घातक हल्ला करणे, असे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये