ताज्या बातम्यामनोरंजन

‘धर्मवीर 2’ मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार – एकनाथ शिंदे

Dharmaveer 2 : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडाच्या एक महिन्यापूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की,”धर्मवीर 2′ (Dharmaveer 2) या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे”.

“आनंद दिघे माझ्या पाठिशी” : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी मुख्यमंत्री झालो यामध्ये दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि बाळासाहेबांचे विचार आहेत. सत्तेचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी हीच त्यांची शिकवण होती. आम्ही त्याच मार्गावर आहोत. सरकार बनल्यापासून काही लोक सरकार पडणार म्हणत होते, आता ज्योतिषी थकले, आता मुख्यमंत्री बदलणार म्हणतात, 31 डिसेंबर तारीख देत आहेत. पण माझ्या पाठीशी आनंद दिघे होते. अयोध्या इथे पहिली चांदीची विट दिघे साहेब यांनीच पाठवली होती, काही लोक म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे, पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवले आणि तारीख पण सांगितली”.

शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात?

‘धर्मवीर 2’ सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे (Pravin Tarde) निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे. एकंदरीतच ‘धर्मवीर’ सिनेमात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता ‘धर्मवीर 2’मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये