जे शाकीबला जमलं ते स्मिथनं का टाळलं? मॅथ्यूजचा TimeOut, गांगुली 6 मिनिट Late, तरीपण आऊट दिलं नाही
Angelo Mathews Timed Out Sourav Ganguly : आयसीसी विश्वचषक (ICC World Cup 2023) स्पर्धात सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका (Sri Lanka) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एक मोठा वाद समोर आला. हे प्रकरण देशासह संपूर्ण जगभरात वादाचा मुद्दा बनला आहे. सामन्यात टाईम आऊट होण्याचा वाद सध्या जोरदार चर्चेत आहे.
श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पण तुम्हाला माहितीय का? मॅथ्यूजच्या आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील एकदा टाईमआऊटच्या विळख्यातून थोडक्यात निसटला होता.
तब्बल 16 वर्षांपूर्वीची घटना. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन कसोटी सामना खेळला जात होता. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स अवघ्या 6 धावांत गमावल्या. वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर एकापाठोपाठ एक बाद झाले होते.
यानंतर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी मैदानात येणार होता, मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो काही काळ मैदानाबाहेर राहिला. त्यामुळे तो निर्धारित वेळेपूर्वी फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण आंघोळीसाठी गेला होता. त्यादरम्यान सौरव गांगुली ट्रॅकसूटमध्ये फिरत होता. त्याला लगेच तयार होऊन मैदानात यावं लागणार होतं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मग टीम स्टाफ गांगुलीला तयारी करण्यासाठी मदत करु लागले. ड्रेसिंग रुममध्ये एकच गोंधळ उडाला.
कुणी गांगुलीला पॅड घालतंय, तर कुणी जर्सी घालतंय. एवढं सगळं करूनही गांगुलीला मैदानात येण्यास 6 मिनिटं उशीर झाला. क्रिकेटच्या नियमानुसार कोणत्याही फलंदाजाला मैदानात जाऊन पुढचा चेंडू 3 मिनिटांत खेळायचा असतो. मात्र, त्यावेळी सौरव गांगुलीला एक, दोन नाही, तब्बल 6 मिनिटं उशीर झाला. गांगुली मैदानात आला तेव्हा पंचांनी सर्व नियम आणि प्रकरण दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला समजावून सांगितलं होतं. मात्र, स्मिथनं टाईमआऊटचं कोणतंही अपील केलेलं नाही. स्मिथनं खिलाडूवृत्ती दाखवत गांगुलीला टाईमआऊट होऊ दिलं नाही. आणि टीम इंडियाचा दादा एका टाईमआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला.