वाद पेटला! यशोमती ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’! म्हणून त्यांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
अमरावती : (Anil Bonde On Yashomati Thakur) काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती यांच्यावर टीका करताना भाजपच्या खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. “इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’,” असं वादग्रस्त वक्तव्य राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.
भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे,” असंही बोंडे पुढे म्हणाले आहेत.
भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरु आहे. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. दरम्यान या यात्रेवरून यशोमती ठाकूर यांनी भाजपला टोला लगावला होता. “निवडणुका आल्या की भाजपला असे धंदे सुचतात,” अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्याला अनिल बोंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.