ईडीनं तारलं पण सीबीआयनं मारलं; देशमुखांची दिवाळी तुरूंगातच

मुंबई | Anil Deshmukh – संजय राऊतांपाठोपाठ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनाही दिलासा मिळालेला नाही. कथीत 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख गेल्या 11 महिन्यांपासून तुरूंगात आहेत. या प्रकरणी सीबीआय आणि ईडी दोघांनीही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वीच ईडीच्या गुन्ह्यांमध्ये देशमुखांना जामीन मिळाला होता. मात्र, याच प्रकरणात त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केला असल्यानं त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं. तसंच आता देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे अनिल देशमुखांची दिवाळी तुरूंगातच जाणार आहे.
“देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचा जबाब महत्त्वाचा आहे”, असं विशेष सीबीआय न्यायालयानं देशमुख यांना जामीन नाकारताना नमूद केलं आहे.
दरम्यान, ईडीच्या प्रकरणात जामीन अर्ज मिळाल्यानंतर सीबीआयच्या प्रकरणातही त्यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र न्यायालयानं त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे.