साई रिसॉर्ट प्रकरण: “हिंमत असेल तर…,” अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान

रत्नागिरी : (Anil Parab On Kirit Somaiya) भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या कामास सुरुवात झाली असल्याच्या दाव्यानंतर शिवसेना नेते अनिल परबांनी सोमय्यांना थेट आव्हान दिले आहे. साई रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. कोर्टाने या प्रकरणात ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत, असं अनिल परब म्हणाले.
“या रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. या आदेशांतर्गत कोर्टाने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे,” असे अनिल परब म्हणाले.
पुढे ते म्हणाले “मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्या यांचा उद्देश आहे. ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्याबाबत सोमय्या एकही शब्द बोलत नाहीत. त्यांच्याविरोधात बोलायची सोमय्या यांच्यात हिंमत आहे का? हिंमत असेल तर सोमय्या यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरोधात बोलून दाखवावं. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत नारायण राणे यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन जात नाहीयेत. सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावं लागेल,” असंही अनिल परब आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.