अनिल परब यांची कोट्यावधींची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई | Anil Parab – शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल परब यांची कोट्यावधींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून ही कारवाई दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी करण्यात आली आहे. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, परब यांची 10. 20 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. याबाबतची माहिती ईडीनं ट्विटद्वारे दिली आहे. मात्र, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं अनिल परब यांनी या कारवाईनंतर म्हटलं आहे.
आज (4 जानेवारी) ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केल्याची माहिती दिली आहे. परब यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. ईडीनं ही कारवाई पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे केली आहे.
अनिल परब यांची दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून अनेक वेळा चौकशी झाली होती. तसंच साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात पर्यावरण खात्यानं तक्रार केली होती.