उल्हासनगर : जून महिन्यातल्या २० तारखेपासून उद्धव ठाकरेंची उतरंड सुरु झाल्याचं दिसत आहे. आगोदर शिवसेनेतले महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून एक वेगळा गट तयार केला.आणि राज्याबाहेर निघून गेले. त्यानंतर दररोज दोनचार करत शिवसेनेतील जवळपास ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात एंट्री केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोबतच्या बंडखोर आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. मात्र, उध्दव ठाकरेंना चाळीस आमदार आणि मुख्यमंत्री पदच गमावले नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक नगरसेवक, कार्यकर्ते त्याचबरोबर खासदारही शिंदे गटाला पाठींबा देत आहेत.
अगोदर ठाणे, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ पाठोपाठ आता उल्हासनगर शहरातील १५ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यातील आनंदाश्रम येथील आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मधील १५ नगरसेवकांची भेट घेत ते शिंदे गटात सामील झाल्याचं जाहीर केलं. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे २५ नगरसेवक होते त्यापैकी १५ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.