जालन्यातील लाठीचार्जवेळी पोलीस अधिक्षक असलेल्या दोशींची पुण्यात बदली!
पुणे | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. गृह विभागाने सोमावारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. अमरावतीतील उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
यावरून आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गृहविभागवर निशाणा साधला आहे. मराठा आंदोलकांना मारल्याचे तुषार दोशी यांना बक्षीस मिळाले आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी या निशाणा साधला आहे. आंदोलकांना मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले आहे .निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दोशी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. ते कल्याण मधील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.