नारायणगावात आठ बांगलादेशी एटीएसच्या जाळ्यात
पुणे | दहशतवाद विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना गुरुवारी पकडले. प्राथमिक चौकशीत बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी नागरिक नारायणगाव परिसरात मजुरी करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
मेहबुल नजरून शेख, राणा जमातअली मंडल, गफूर राजेवली शेख, आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफिजूर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला, जमातअली व्हायतअली मंडल या आठ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे.
नारायणगाव परिसरात बांगलादेशी नागरिकांनी बेकायदा वास्तव्य केले होते. याबाबतची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने गुरुवारी आठ बांगलादेशी नागरिकांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले.