“…त्यामुळे आम्ही कोणत्याही देशावर बाॅम्बहल्ला करू”, रशियानं दिली थेट युद्धाची धमकी
माॅस्को | Vladimir Putin – गेल्या वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) या दोन देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये. अद्यापही दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ सुरू आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांना अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं वाॅरंट जारी केलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पुतीन यांना अटक झाली तर त्याचे परिणाम काय होणार? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रशियानं आख्ख्या जगालाच युद्धाची धमकी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयानं गेल्या आठवड्यात व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी केलं आहे. युक्रेन युद्धातील युद्धगुन्ह्यांसाठी पुतीन यांच्याविरोधात हे अटक वाॅरंट न्यायालयानं जारी केलंय. युक्रेनमधून बेकायदेशीररीत्या हजारो मुलांना देशाबाहेर काढल्याचा आरोप पुतीन यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयानं या युद्धामध्ये घडलेल्या बेकायदेशीर बाबींसाठी पुतीन वैयक्तिकरीत्या दोषी असल्याचा निर्वाळा दिला आहे.
तसंच आता एकीकडे पुतीन यांना अटक होणार का? यावर अनिश्चितता निर्माण झालेली आहे. तसंच रशियानं त्याचा विरोध करण्यासाठी आख्ख्या जगालाच युद्धाची धमकी दिली आहे. “व्लादिमिर पुतीन यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे अप्रत्यक्षरीत्या युद्धाची घोषणाच असेल”, अशी धमकी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांच्या सुरक्षा कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे.
“तुम्ही कल्पना करा की एका अण्वस्त्रधारी देशाचा विद्यमान प्रमुख दुसऱ्या एखाद्या देशात गेला, उदाहरणार्थ जर्मनीमध्ये गेला आणि त्याला तिथे अटक झाली, तर त्याचे परिणाम काय होतील? अर्थात, रशियन फेडरेशनविरोधात ती युद्धाची घोषणाच ठरेल. तर अशा परिस्थिती आमची सर्व संरक्षण आणि हल्ला प्रणाली कार्यान्वित होईल. त्यामुळे रशिया कोणत्याही देशावर बॉम्बहल्ला करू शकतो”, असा गंभीर इशारा मेदवेदेव यांनी दिला आहे.