अर्चना गौतमला काँँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप; म्हणाली…
नवी दिल्ली | Archana Gautam – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे अर्चनाला काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. तसंच यावेळी अर्चनानं गंभीर आरोप देखील केले आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अर्चना गौतम तिच्या वडीलांसह दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात गेली होती. त्यावेळी तिला आणि तिच्या वडिलांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप अर्चनानं केला आहे. अर्चना तिच्या वडिलांसह काँग्रेस कार्यालयात गेली त्यावेळी तिला कार्यालयात जाऊ दिलं गेलं नाही. तसंच तिथे असलेल्या काही महिलांनी अर्चनाला धक्काबुक्की करत मारहाण केली असल्याचं अर्चनानं म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जात असताना मला आणि माझ्या वडिलांना अडवण्यात आलं. त्यावेळी आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. तसंच शिवीगाळ करत आम्हाला कार्यालात जाऊ दिलं नाही. माझ्या वडिलांनी मला सावरलं आणि आम्ही कारमधून निघून गेलो. आता मी शांत बसणार नाही. माझ्यासारख्या अभिनेत्रीसोबत काँग्रेस पक्ष अशा पद्धतीने वागत असेल तर मग इतरांचं काय? मी आता गप्प बसणार नाही, असंही अर्चनानं म्हटलं आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण तिथे गेलो होतो. पण त्यावेळी हा प्रकार घडल्याचं अर्चनानं सांगितलं आहे.