अर्जुनाचे सत्ता हेच लक्ष्य

प्रादेशिक पक्षातील दिग्गजांना सांभाळून भक्कम करणे सोपे काम नाही. या सगळ्यांचे एका दिशेला तोंड करून भाजपविरोधात उभे करायचे आणि अखेरीस सत्ता ताब्यात ठेवायची ही कसरत मल्लिकार्जुन खर्गे यांना करावी लागेल. हे सगळे करत असताना काँग्रेसची महान परंपरा कायम ठेवत भारत जोडोला सबळ करावे लागणार आहे. महाभारतात अर्जुनाला पक्षाचा केवळ डोळा दिसत होता. खर्गे यांना काँग्रेसला मिळवून द्यावी लागणारी सत्ता दिसली पाहिजे.

ग्रेसची स्थापना आणि त्यानंतरचा आजचा प्रवास हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचाही इतिहास आहे. साहजिकच तो कोण्या एका पक्षाचा अथवा व्यक्तीचा इतिहास होऊ शकत नाही. अर्थात हा मुद्दा देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत विशेषत्वाने मान्य केला जातो, तर स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसचे अध्यक्षपद आणि काँग्रेस हा विषय हळूहळू परिवारवादाचा रंग घ्यायला लागलेला दिसून येतो.

असे म्हणायचे कारण गांधी-नेहरू परिवाराकडे स्वातंत्र्यानंतर म्हणजे गेली ७५ वर्षांतले ४१ वर्षे अध्यक्षपद होते. त्यातले सोनिया गांधी यांच्याकडे सुमारे २४ वर्षे होते. त्यामुळे विरोधकांनी हा पक्ष खासगी, एका परिवाराच्या मालकीचा आहे असा प्रचार करून हा विचार रुजवला आहे.

खरे तर भारतीय जनता आणि ब्रिटिशांमध्ये संवाद निर्माण व्हावा आणि स्वातंत्र्यासाठी विचारविनिमय व्हावा यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. देशातील अत्यंत चारित्र्यसंपन्न, विद्वान, अभ्यासू आणि देशाबद्दल, देशाच्या भविष्याबद्दल आस्था असणारी मंडळी काँग्रेसमध्ये होती. राज्यातील विविध भागातून, प्रांतातून ही मंडळी देशसेवा, समाजसेवा आणि स्वातंत्र्यासाठी एकत्र आले होते.

त्यांच्या ज्ञानाच्या आणि विद्वत्तेच्या प्रभावामुळे काँग्रेसचे नेतृत्व सहजासहजी त्यांच्याकडे जात होते. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी पर्वाचा उदय झाला आणि स्वातंत्र्य लढ्यालाही कालांतराने वेग आणि आवेग निर्माण झाला. या काळात स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. त्यांनी ते पुढे नेले. त्यासाठी निवडलेल्या त्यांच्या साथीदारांमध्ये त्यांच्या विचारसरणीबरोबर जाणारी किंवा मतभेद असणारी असे दोन्ही गट होते.

मात्र स्वातंत्र्यप्राप्ती हे महत्त्वाचे उद्दिष्ट सगळ्यांसमोर असल्याने असलेले मतभेद वैयक्तिक, टोकाचे नव्हते. महात्मा गांधी सांगतील ती पूर्व दिशा होत होती. स्वातंत्र्यानंतर विशेषतः नेहरू युग संपल्यावर इंदिरा गांधी यांचा उदय झाला आणि हळूहळू पक्ष परिवारवादाच्या रिंगणाला तयार करणारा झाला. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या तावडीत असलेल्या पक्षाला परिवारवादाच्या शिक्क्यातून मोकळे करायच्या दृष्टीने खर्गे यांची निवड स्वागतार्ह आहे.

ही परंपरा कायम राहील, अशी अपेक्षा आता करायला हरकत नाही. या निवडीवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरे तर काँग्रेसपुढे आत मोठे आव्हान आहे ते पुन्हा सत्तेत येण्याचे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेसची जी दैना २०१४ सालात झाली ती २०१९ सालातही थांबवता आली नाही. काँग्रेसचा यशाचा आलेख उतरताच राहिला. जो आलेख एके काळी काँग्रेस विरोधकांचा होता तोच आज काँग्रेसचा आहे.

त्यातून बाहेर पडण्यासाठी नेतृत्वात बदल होणे, नव्या कल्पना, विचार, त्यावर अंमलबजावणी, कार्यकर्त्यांना उपक्रम आणि कार्यक्रमात गुंतवून ठेवणे यासाठी पक्षावर पकड असली पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर भक्कम संपर्क यंत्रणा असली पाहिजे. मात्र सोनिया गांधींनी काँग्रेसला पडत्या काळात यथाशक्ती जिवंत ठेवण्याचे काम केले. त्या वेळी गांधी परिवाराच्या नावाचा फायदा पक्षाला झाला.

पंतप्रधानपदी साेनिया गांधी विराजमान झाल्या नाहीत, मात्र पंतप्रधान पदापेक्षा अधिक शक्तिशाली केंद्र त्यांनी निर्माण केले. डॉ. मनमाेहन सिंग यांना सलग दहा वर्षे पंतप्रधान पदावर ठेवण्याची ताकत त्यांनी दाखवली. काँग्रेसच्या अध्यक्षांची ही ताकत आहे त्यात गांधी परिवाराच्या नावाचा करिष्मा आहे हे त्यांनी अधोरेखित केले .

अनेक आव्हाने समोर
खर्गे यांच्यासमोर म्हणजे काँग्रेससमोर कोणते आव्हान आहे हे पाहणे आवश्यक आहे. खर्गे यांना काँग्रेसला मजबूत करायला पाहिजे. याचा अर्थ कार्यकर्ते, इतर पक्षांत जाणारे नेते यांना रोखणे आणि वाढवणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणे हे आज सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या सर्व ताकतीपुढे काँग्रेस खूपच कमी ताकतीचा आहे. देशभरातील विविध राज्यांमध्येही त्यांची ताकत संपत चालली आहे. हातात आलेली राज्ये नियोजन, धोरण आणि आळसामुळे गमावली आहेत.

प्रादेशिक पक्षांना आपल्याकडे ख्रेचून घेण्यासाठी मोठे उद्दिष्ट नजीकच्या काळात प्राप्त होईल असे वाटत नाही. प्रादेशिक पक्षांच्या महत्त्वाकांक्षा आहेत. ते राष्ट्रीय पक्षालाच आपल्या फायद्यासाठी वापरायला निघाले आहेत. त्यांची धोरणे संधिसाधू आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ज्या प्रकारे काँग्रेसला वाकवत आहे आणि आपल्या लाभ क्षेत्रात काँग्रेसला फिरकूनही देत नाही हे पाहता काँग्रेस राज्याराज्यांमध्ये उपरी झाली आहे हे लक्षात येईल. बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.

दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या नाराज गटाला सांभाळून पक्षाला पुढे न्यायचे आहे. त्यांनी शशी थरूर यांच्यावर जबाबदारी देत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. तसेच राज्याराज्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे अनेक काँग्रेसनिष्ठ नाराज होऊन काॅग्रेसपासून दुरावले आहेत. अशा मंडळींना पुन्हा एकदा प्रोत्साहित केले पाहिजे. केंद्राच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड एकत्र कशी आणता येईल हे पहाणे ही आवश्यक आहे. यातील काही मंडळी भाजपकडे गेली आहेत काही जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना त्यांच्या क्षमतांना वाव देत, मोकळेपणाने काम करू दिले पाहिजे. महाराष्ट्रात मिलिंद देवरा, प्रतीक पाटील ही मंडळी एकेकाळी राहुल गांधी यांच्या अंतर्गत गोटात होती. आज ते कुठे आहेत? खर्गे यांना ही मंडळी पुन्हा जोडावी लागतील.

शिक्का पुसायला हवा
खर्गेंवर गांधी परिवाराचे एकनिष्ठ हा शिक्का आहे. हा शिक्का पुसणे सोपे नाही. सोनिया गांधी यांनी खर्गे यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले, तर २०१९च्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर त्यांना राज्यसभेवर पाठवले. गुलाम नबी आझाद यांची मुदत संपल्यावर त्यांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते करणे याचा अर्थ त्यांना झुकते माप देणे होय.

किंबहुना पक्षाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात परिवारामुळेच पडली हे पण सत्य आहे. मात्र आता त्यांना केवळ गांधी परिवार नव्हे तर काँग्रेस सांभाळायची आहे. लोकसभा आणि विधानसभेत त्यांना काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणे आणि अखेरीस २०२४ च्या तयारीचा उत्तरार्ध तडीस नेण्याचा यथार्थ प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे.

यूपीएच्या प्रमुख पदाची चर्चा कायम केली जाते. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव यूपीए प्रमुख पदासाठी घेतले आहे. त्यांचे स्वतःचे नाव सुचवण्याचे उद्योग सुरु आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी , चंद्रशेखर राव, नितीशकुमार हे पण शर्यतीत आहेत. मात्र काँग्रेसला वगळून दुसरी, तिसरी कोणतीच आघाडी होऊ शकत नाही, हे वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे.

यूपीएची धुरा या सगळ्यांना सांभाळूत भक्कम करणे सोपे काम नाही. या सगळ्यांना एका दिशेला तोंड करून भाजप विरोधात उभे करायचे आणि अखेरीस सत्ता ताब्यात ठेवायची ही कसरत त्यांना करावी लागेल. हे सगळे करत असताना काँग्रेसची महान परंपरा कायम ठेवत भारत जोडोला सबळ करावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

खर्गे सांगतील तसे मी वागेन असे त्यांनी सांगितले आहे. मात्र खर्गेंनीच मी तुम्हाला काय सांगू असा प्रश्न राहुल गांधींना विचारू नये. खर्गे यांच्या पुढे अनेक आव्हाने आहेत. खर्गे हाडाचे कार्यकर्ते आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकांशी परिचय आहे. त्यामुळे क्लास आणि मास दोन्ही सांभाळणे त्यांना जमवावे लागेल. काँग्रेसला संक्रमणातून चांगल्या ठिकाणी न्यावे लागेल.

Prakash Harale: