पुण्यात गुंडांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; सात पिस्तुलांसह २४ काडतुसे जप्त
पुणे | गावठी पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडांना कोंढवा पोलिसांनी पकडले. ही कारवाई बोपदेव घाट परिसरात करण्यात आली. गुंडांकडून सात गावठी पिस्तुले, २४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या पथकाने जळगाव परिसरातून गुंडांना पिस्तूले पुरविणाऱ्या एकास अटक केली.
संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय ३२, रा. गोकुळ हाऊसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली), शिवाजी ज शिवा भाऊ कुडेकर (वय ३४, रा. वाशेरे, ता. खेड), राहुल नानसिंग लिंगवाले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संदेशविरुद्ध चिखली, देहूरोड, वडगाव मावळ, चिखली, भोसरी पोलीस ठाण्यात ३२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार शिवाजी याच्याविरुद्ध खून, लूट असे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.
बोपदेव घाटात संदेश आणि शिवाजी थांबले असून, ते देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. संदेश आणि शिवाजी यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमराटी गावातून ओंकार बरनाला याच्याकडून पिस्तुले खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संदेश आणि शिवाजी यांच्या माध्यमातून बरनाला याच्याशी संपर्क साधून पिस्तूल आणि दहा काडतुसांची मागणी केली. बरनालाने पोलिसांना मध्यप्रदेशात पिस्तूल खरेदीसाठी बोलाविले. पोलिसांचे पथक जळगाव परिसरात पोहोचले. चोपडा परिसरात बरनालाने त्याचा साथीदार लिंगवाले याला पाठविले. पोलिसांच्या पथकाने ग्रामस्थांप्रमाणे वेशभूषा केली होती. पोलिसांनी सापळा लावून लिंगवालेला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दहा काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच बरनाला पसार झाला. पोलिसांनी संदेश, शिवाजी आणि लिंगवालेकडून एकूण सात पिस्तूले, १४ काडतुसे जप्त केली.
पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप भोसले, संजय मोगले, सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी ही कामगिरी केली.