पुण्यात मविआत बिघाडी? मनपा निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा!

पुणे : (Arvind Shinde On MVA Pune) तोंडावर आलेल्या पुणे महापालिका निवडणुकासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज पुणे शहर जिल्हा कोअर कमिटीची काँग्रेस भवन येथे बैठक पार पडली. यावेळी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांकडून आगामी पालिका निवडणुक पक्षाने स्वबळावर लढावी अशी मागणी केली.
सध्या पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात पालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुराळा चांगलाच उडणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. त्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत देखील बिघाडी पहायला मिळत आहे.
नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीमुळे येणारी पुणे महापालिकेत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा देखील शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे. काँग्रेसच्या या भुमिकेमुळे आघाडीत बिघाडी होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.