भाजी मंडई नसल्याने विक्रेत्यांचा खोळंबा

विश्रांतवाडीतील समस्या : अनिल साळुंके करणार पाठपुरावा
तीस – पस्तीस वर्षांपासून पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मंडईची मुख्य समस्या लक्षात घेऊन यासंदर्भात पाठपुरावा करून भाजी मंडई उभारणीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मनसेचे शहर उपाध्यक्ष अनिल साळुंके यांनी दिले आहे.
राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
येरवडा : अनेक वर्षांपासून विश्रांतवाडी भागाला अद्यापही भाजी-मंडई नाही. नाईलाजास्तव विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी रस्त्यावर बसण्याची वेळ येत असल्याने खोळंबा झाला, असे म्हणण्याची वेळ विक्रेत्यांवर आली अाहे. यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचा दावा मनसेचे शहर उपाध्यक्ष अनिल साळुंके यांनी केला आहे.
येरवडा, वडगाव शेरी पाठोपाठ विश्रांतवाडी भागाचा महापालिकेत तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेत समावेश झाल्याने त्यादरम्यान विविध विकास कामापाठोपाठ परिसरातील असलेला भाजी-मंडईचा प्रलंबित प्रश्न पालिकेच्या वतीने मार्गी लागेल, अशी आशा लावून नागरिकांना नुसतीच स्वप्न दाखविली जात आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा विनाकारण फटका भाजी-विक्रेत्यांसह गिऱ्हाईकांना सहन करावा लागतो आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याने नाराजीचे सूर उमटत आहे. कारण या भागातून आळंदी, लोहगाव अंतरराष्ट्रीय विमानतळ, खडकी कॅन्टोमेंट व पुणे शहराकडे मार्ग जात असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते.
भाजी-मंडई नसल्याने भाजी-विक्रेते आळंदी मार्गावरील रस्त्यावरच भाजी विक्री करण्यासाठी बसलेले असतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाहनतळ नसल्याने येणारे ग्राहक स्वतःचे वाहन रस्त्यावरच लावतात. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या लांबवर रांगा लागून वाहतूक कोंडीचे चित्र नेहमीच परिसरात पाहायला मिळत आहे.
त्यातच एखाद्या अज्ञात व्यक्तीने एखाद्या ग्राहकास वाहन बाजूला घेण्याची विनंती केल्यावर अनेकदा त्यांच्या दहशतीचा सामना करण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचे चित्र आहे.
तर या मार्गावर नेहमीच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे हा मार्ग वाहनचालकासाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यातच परिसरात पालिकेसह खासगी संस्थांची महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. एखाद्या दिवशी वाहनाचा धक्का लागून अपघात घडल्यास यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेकदा लष्कराचे रणगाडे या मार्गावरूनच जात असल्यामुळे भाजी विक्रेत्यांना असणारा भाजीचा माल नाईलाजास्तव उचलण्याची वेळ येते.
अनेक प्रकारांनी भाजी विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या वतीने शहरासह उपनगर भागात अनेक ठिकाणी भाजी मंडई उभारली असतांना देखील आजपर्यंत या भागात का नाही. असा सवाल नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. कारण पालिकेला कोणतीही विकासकामे करायची झाल्यास ती जनतेच्या पैशातून केली जात आहे.
पालिकेच्या वतीने जनतेची दिशाभूल करून त्यांना अंगठा दाखवून विकासकांच्या बाबतीत केराची टोपली दाखवली असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. तरी नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन परिसरात लवकरात लवकर भाजी मंडई उभारण्याची मागणी येत आहे.